नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
दिव्यसारथी ऑनलाईन : आज 1 जानेवारीरोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळालाय.
आज 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 14.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आली नाही.मागच्या वर्षी 1 मार्चला घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता.त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
नवीन दर काय आहेत?
1 जानेवारी रोजी सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यानुसार, दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडर 1804 रुपयांना, मुंबईत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये तर कोलकाता शहरात 1911 रुपयांना मिळणार आहे.
याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 1818.50 रुपये होता. दिल्लीमध्ये आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये असून कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये तर चेन्नईत 818.50 रुपये आहे. जवळपास 6 महिन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे.
यापूर्वी मागच्या वर्षी जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ दिसून आली. तर, घरगुती गॅसचे दर अजूनही जैसे थेच आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला होता.