जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार
जैन इरिगेशन ही कॉफीचे टिश्यूकल्चर विकसीत करणारी जगातील पहिली कंपनी
जळगाव | प्रतिनिधी
टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने आता कॉफी पिकामध्ये टिश्यूकल्चर तंत्रज्ञान विकसीत केले आहे. याच श्रृखंलेत आता टिश्यूकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायीक तत्त्वावर केली जाणार आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार भारत सरकारच्या कॉफी बोर्डासोबत नुकताच करण्यात आला. याअंतर्गत रोबस्टा आणि अरेबिका कुळातील उच्च उत्पन्न देणाऱ्या कॉफीच्या सात वाणांची टिश्यूक्लचर पद्धतीने निर्मित रोपांची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसा परवाना भारत सरकारच्या कॉफी बोर्डाने जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडला बहाल केला आहे.
भारत हा जगात कॉफी उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश असून टिश्यूकल्चरच्या रोपांमुळे निर्यातक्षम उत्पादनाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी करारावेळी व्यक्त केला. या करारामुळे भारतातील कॉफी उद्योगात क्रांती घडून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.
जैन टिश्यूकल्चर कॉफी रोपे ही गुणवत्तापूर्ण मातृवृक्षांपासून तयार केली जातात. उच्च उत्पन्न, उत्कृष्ट सुगंध गुणवत्ता आणि रोपांचा संतुलित घेर व आकार या परिमाणांवर निवडलेली असतात. टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे ही व्हायरस फ्री, कार्यक्षम आणि अनुवंशिकदृष्ट्या एकसारखी असतात. कॉफीच्या शाश्वत शेतीसाठी टिश्यूकल्चर रोपांची लागवड नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या जैन इरिगेशन केळी, डाळिंब आणि संत्रा यांची टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे यशस्वीरित्या तयार करून पीक शाश्वतीच्या उपायांमध्ये अग्रेसर आहे. या रोपांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे उत्पादन होऊन आर्थिक स्थिरता आली आहे.
भारतात सध्या जुन्या पद्धतीने कॉफी रोपांची लागवड करण्यात येते. यात दर्जेदार रोपे आणि प्रगत, तंत्रज्ञानाची उणीव जाणवते. त्यामुळे नविन विकसीत कॉफी टिश्यूकल्चर रोपांचे विविध फायदे कॉफी उत्पादकास मिळतील. यामुळे भारत व इतर देशांमध्ये कॉफी उद्योगाला निश्चित चालना मिळेल.
शेती अजूनही अनेक पातळ्यांवर अकार्यक्षम आहे. अजुनही शेतीमध्ये पारंपारिक पद्धतींचा वापर केला जात आहे. यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स ही सतत शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अग्रेसर आहे. ही वचनबद्धता जैन इरिगेशनने हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे या ध्येयाप्रमाणे काम सुरु असून टिश्यूकल्चर कॉफी रोपे हा जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना समृद्धी देण्यासाठी तयार केलेला आणखी एक परिवर्तनकारी उपाय आहे.
“जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ला टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे जगासमोर आणताना अत्यंत अभिमान वाटतो आहे. रोगमुक्त, अनुवंशिकदृष्ट्या एकसमान आणि अधिकचे उत्पन्न देणारी, असे विविध वैशिष्ट्ये असलेली कॉफीची टिश्यूकल्चर रोपे भारतीय कॉफी उत्पादकांना समृद्धी देईल.”
-अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
“जगात प्रथमच जैन इरिगेशनच्या माध्यमातून भारतात कॉफीसाठी टिश्यूकल्चर तंत्रज्ञान प्रमाणित केले आहे. या टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या कॉफी रोपांचे शेतात मूल्यांकन केले गेले आहे. हे नवनिर्मित तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितच नियमित वाणांपेक्षा खूप चांगले परिणाम दाखवत आहे. कॉफी बोर्ड, कॉफी उत्पादकांची असोसिएशन आणि व्यक्तीगत कॉफी इस्टेट मालकांच्यावतीने या कराराचे मी मन:पुर्वक स्वागत करतो. ’’
-के. जी. जगदीशा, सचिव व सीईओ, कॉफी बोर्ड, भारत सरकार