DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जळगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

 

जैन हिल्स च्या सुधिर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थीत होते. यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांची उपस्थिती याप्रसंगी होती. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बुद्धिबळ प्रचार-प्रसाराच्या कार्याला अधोरेखित करून ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ या पुरस्काराने श्री. अशोक जैन यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

श्री. मकरंद वेलणकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यात ते म्हणाले, बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला तयार होतील या उद्देशाने पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. श्री. अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळमध्ये श्री. अशोक जैन यांच्या कार्याचा आढावा सांगितला. खेळ आणि खेळाडू मोठे झाले पाहिजे या एकाच ध्येयामुळे श्री. अशोक जैन यांनी काम केले आणि करित आहे. त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते सतत कार्य करीत आहे. आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहत आहेत. आज  महाराष्ट्रात ११ पुरूष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय हे श्री. अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात आहे असेही श्री. अभिजीत कुंटे म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना श्री. अशोक जैन यांनी लहानपणाच्या बुद्धिबळातील आठवणींना उजाळा दिला. श्री. अभिजीत कुंटे ह्यांनी आपण बुद्धिबळामध्ये कार्य करावे असे सुचविले आणि त्यातूनच पुन्हा बुद्धिबळाकडे वळलो. महाराष्ट्रात चेसिंग स्कूल, चेस लिग सुरू करावे. जेणे करून या स्पर्धात्मक उपक्रमातून चांगल्या गुणवत्तेचे खेळाडू पुढे येतील. सर्वांनी मिळून खेळ वाढविला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सह्याद्री काबीज केला आहे. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. तोही सर करावा. अशी ही अपेक्षा बुद्धिबळ प्रेरणा दिनानिमित्त आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी निलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रीतरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे त्यांचा श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, श्री. अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमूख, प्रविण ठाकरे, रविंद्र धर्माधिकारी यांनी श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला. संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनीही श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला.

सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. चंद्रशेखर देशमुख यांनी आभार मानले. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.