महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्ण आढळले
नागपूर : भारतात HMPV म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशभरात आतापर्यंत सात जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र, केंद्र सरकारने सांगितले आहे की या प्रकरणांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. बेंगळुरू, नागपूर, आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण नोंदवला गेला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे स्पष्टीकरण
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी व्हिडिओद्वारे माहिती दिली की, HMPV हा नवीन विषाणू नाही. 2001 साली या विषाणूची प्रथम ओळख झाली आणि त्यानंतर तो संपूर्ण जगभर पसरला आहे. हा विषाणू श्वसनमार्गातून हवेच्या माध्यमातून पसरतो आणि सर्व वयोगटांतील लोकांना प्रभावित करू शकतो. विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या मिळाल्यानंतर केंद्र सरकार, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), आणि एनसीडीसी (राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र) यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) लवकरच यावर आपला अहवाल सादर करेल. नड्डा यांनी स्पष्ट केले की, भारतात सामान्य श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये विशेष वाढ झालेली नाही.
देवेंद्र फडणवीस यांची घाबरू नये अशी विनंती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले आहे की HMPV विषयी घाबरण्याची गरज नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की हा विषाणू नवीन नाही; तो यापूर्वीही दिसून आला आहे आणि सध्या तो पुन्हा सक्रिय झाला आहे. लवकरच योग्य ती नियमावली जाहीर केली जाईल. तसेच केंद्र सरकारने राज्यांना यासंदर्भात माहिती पुरविण्याचा निर्णय घेतला असून माध्यमांनी अधिकृत माहितीच प्रसारित करावी, असेही त्यांनी सुचवले.
तमिळनाडू आणि राजस्थान सरकारचा सावधानतेचा सल्ला
तमिळनाडू सरकारनेही दोन रुग्ण आढळल्याची माहिती दिली असून HMPV विषाणू कोणताही नवीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. या विषाणूची ओळख 2001 साली झाली होती. आरोग्य विभागाने सांगितले की, HMPV चे संक्रमण बहुतेक वेळा स्वतःहून ठीक होणारे आहे. त्यासाठी पुरेसा आराम आणि हायड्रेशन आवश्यक असते. उपचारासाठी सहायक पद्धती वापरण्यात येतात.