DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

इंग्लिश फॉर ऑल’ या केंब्रिज प्रेस निर्मित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

जळगाव: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इंग्रजी विषयाच्या प्रथम वर्ष पदवी स्तरासाठी आवश्यक ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफे. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आले. विद्यापीठाच्या इंग्रजी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूपेंद्र कसूर (जळगाव), सदस्य डॉ. लिलाधर  पाटील (अमळनेर), डॉ. जगदीश पाटील (फैजपूर) व  डॉ. हेमंत पाटील (म्हसदी) यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी विद्यापीठात संपन्न झालेल्या या प्रकाशन प्रसंगी केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस चे पश्चिम विभागाचे  प्रमुख रंजन गुप्ता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र . कुलगुरू डॉ. एस. टी . इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, आंतरविद्याशाखेचे  अधिष्ठाता डॉ. एस. टी . भुकन आदी मान्यवर हजर होते. प्रकाशित झालेले पुस्तक हे पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखेच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासाला असणार आहे.
‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ ही ४९० वर्षांपासून प्रकाशन क्षेत्रात जागतिक पातळीवर कार्य करणारी नामांकित संस्था असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित हे पहिले पुस्तक प्रकाशित करतांना आनंद होत असल्याचे सांगून  हा प्रवास पुढेही सुरु राहावा यासाठी प्रत्यनशील राहू’ असे मनोगत रंजन गुप्ता यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी लेखक व प्रकाशक यांचे अभिनंदन केले व विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी काही संयुक्त प्रयत्न करता येतील का या विषयी चर्चा केली. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी पुस्तक लेखकांचे व  इंग्रजी अभ्यास मंडळाचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.