राज्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ विशेष मोहीम
मुंबई: राज्यातील सात-बारावर मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी महसूल विभाग १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ मार्च २०२५ पासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याच्या सकारात्मक परिणामांची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने यासंबंधी अधिकृत निर्देश बुधवारी जारी केले.
या उपक्रमाअंतर्गत गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांची नोंद सात-बारावर घेतली जाणार आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना तालुका समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, जिल्हाधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील, तर विभागीय आयुक्तांना विभागीय संनियंत्रण अधिकार्यांची भूमिका दिली आहे.