DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम

मुंबई – सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत आहेत. डिजिटल क्षेत्रातील प्रगतीसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाईन पैसे कमवण्याच्या नादात लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकत आहेत आणि स्वत:चं नुकसान करून घेत आहेत. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे, जिथे वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

महिलेला घातला लाखोंचा गंडा
चंदीगडमधील एका 27 वर्षीय महिलेची वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक झाली. यावेळी स्कॅमर्सनी या महिलेला 5.69 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. स्कॅमर्सनी महिलेला सांगितलं होतं की, इंस्टाग्राम व्हिडीओ लाईक करण्यासाठी त्या महिलेला पैसे दिले जातील. संबंधित महिला स्कॅमर्सच्या या बोलण्याला बळी पडली आणि या घटनेत तिचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही फसवणूक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सुरू झाली. नेमकं हे प्रकरण काय आहे, कशा प्रकारे महिलेची फसवणूक करण्यात आली, याबाबत आता जाणून घेऊया.

नेमकं काय आहे प्रकरण
संबंधित महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. ज्या व्यक्तिने मेसेज पाठवला तिने स्वतःची ओळख ‘स्नेहा वर्मा’ अशी करून दिली. तिने सांगितले की ती एका कंपनीशी संबंधित आहे जी घरून काम करून पैसे कमविण्याची संधी देते. त्या महिलेला सांगण्यात आले की ती फक्त इंस्टाग्राम व्हिडिओ लाईक करून दररोज 4,000 ते 8,000 रुपये कमवू शकते. महिलेला ही कामाची ऑफर आकर्षक वाटली आणि पैसे कमविण्याची चांगली संधी वाटली. म्हणून संबंधित महिलेने स्कॅमर्सची ही कामाची ऑफर स्विकारली. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला एक व्हिडिओ लिंक पाठवली आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. सुरुवातीला, महिलेने काही कामे पूर्ण केल्यानंतर, तिच्या अकाऊंटमध्ये बनावट कमाई दाखवण्यात आली. यामुळे महिलेचा आत्मविश्वास वाढला आणि तिने हे काम करण्यासाठी अजून इंटरेस्ट दाखवला. मग, स्कॅमर्सनी महिलेला सांगितलं की जर तिने गुंतवणूक केली तर तिला जास्त नफा मिळेल.

महिलेने लाखो रुपये कसे गमावले?
महिलेने प्रथम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये दीड लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर, फसवणूक करणाऱ्यांनी तिला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. अशाप्रकारे, महिलेने हळूहळू स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये 5.69 लाख रुपये ट्रान्सफर केले. फसवणूक करणाऱ्यांनी तिचा नफा बनावट अ‍ॅपवर दाखवला जेणेकरून तिला वाटेल की ती चांगले पैसे कमवत आहे. जेव्हा महिलेने तिची “कमाई” काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी तिला सांगितले की तिचा “स्कोअर” 100 गुणांपर्यंत पोहोचला पाहिजे, ज्यासाठी तिला आणखी 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. हे ऐकून त्या महिलेला संशय आला आणि तिने तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. यानंतर महिलेला समजलं की ती फसवणूकीला बळी पडली आहे. यानंतर महिलेने चंदीगडमधील सायबर क्राईम पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्या खबरदारी
अनोळखी नंबरवरून येणाऱ्या सहज कमाईच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका. जर एखादी योजना खूप आकर्षक वाटत असेल, तर प्रथम तिची सत्यता तपासा. तुमच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा पासवर्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
जर तुम्हाला नोकरीची ऑफर मिळाली तर प्रथम इंटरनेटवर त्याबद्दलच्या पुनरावलोकने आणि तक्रारी शोधा.
फक्त विश्वसनीय वेबसाइट्स आणि जॉब पोर्टल्सवरूनच नोकऱ्यांसाठी अर्ज करा. व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर येणाऱ्या ऑफर्स टाळा.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.