जळगावात भरधाव डंपरचा थरकाप; नऊ वर्षीय बालक ठार, जमावाने डंपरला लावली आग
जळगाव – शहरात बुधवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मृत बालकाचे नाव योजस धीरज बऱ्हाटे (वय ९, रा. लीला पार्क, अयोध्या नगर) असे आहे.
योजस आपला मामा आणि बहीण यांच्यासोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, कालिकामाता मंदिर चौकात हा अपघात घडला. या धडकेत योजस जागीच ठार झाला, तर त्याची बहीण भक्ती (वय १३) आणि मामा योगेश हरी बेंडाळे किरकोळ जखमी झाले.
संतप्त जमावाची प्रतिक्रिया : घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी अपघात करणाऱ्या डंपरला पेटवून दिले. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
शोकाकुल कुटुंब: मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेल्यानंतर कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती लावली होती.
पुढील कारवाई: पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेचा तपास सुरू आहे.