PM मोदींच्या ‘घिब्ली’ इमेजची Open AI ‘सीईओ’ ऑल्टमन यांनाही भूरळ
नवी दिल्ली – मागील चार दिवस इंटरनेटवर ‘घिब्ली’ शैलीतील चित्रांनी साेशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटिझन्स चॅटजीपीटी, ग्रोक आणि विविध एआय इमेज जनरेटर सारख्या टूल्सचा वापर करून आपल्यासह आपल्या आवडत्या पात्रांचे ‘घिब्ली’च्या शैलीतील फोटो शेअर करत आहेत. सोशल मीडियावर एआय-जनरेटेड प्रतिमांची चर्चा रंगली. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी घिबली-शैलीतील अॅनिमेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शविणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारच्या अधिकृत अकाउंट, माय गव्हर्नमेंटने Xवरील पोस्टमध्ये शेअर केलेल्या प्रतिमांमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करताना, फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पोज देताना, सिंहाच्या पिलांशी खेळताना आणि अयोध्येतील राम लल्ला मंदिराला भेट देतानाच्या इमेज शेअर करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण कथानकाचा अनुभव…
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘घिब्ली’ इमेजचे शेअर करत ऑल्टमन यांनी भारतीय ध्वजाच्या इमोजीसह पोस्ट पुन्हा पोस्ट केली आहे. तसेच पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मुख्य पात्र? नाही. संपूर्ण कथानकाचा अनुभव आहे. स्टुडिओ घिबली स्ट्रोकमध्ये नवीन भारताचा अनुभव घ्या”.
भारतीय ग्राहकांना जिंकण्याचा प्रयत्न
ऑल्टमन यांच्या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तत्काळ प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ओपनएआयचे सीईओ देशातील कंपनीच्या विस्तार योजना पाहता या प्रतिक्रियेद्वारे भारतीय ग्राहकांना जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काहींनी म्हटलं आहे. मागील आठवड्यात ऑल्टमन यांनी चॅटजीपीटी वापरकर्त्यांना इंटरनेटवर घिब्ली ट्रेंडने व्यापून टाका, असे आवाहन केले हाेते. मात्र जेव्हा जगभरात घिब्लीची क्रेझ वाढल्यानंतर हे वेडेपणाचे आहे. आमच्या टीमला झोपेची गरज आहे,” असेही ऑल्टमन यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले होते.