रक्षाबंधनानिमित्त ठाकरे-शिंदे गट एकत्र; बहिणीने बांधली मशालीची राखी, आमदार भावाचंही गिफ्ट चर्चेत
पाचोरा : शिवसेना फुटीमुळे दुरावलेल भाऊ-बहीण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त एकत्र आले आहेत. शिवसेना ठाकरे गटात असलेल्या बहिणीने शिंदे गटात आमदार असलेल्या भावाला राखी बांधली. जळगावातील पाचोरा येथे ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेले भाऊ किशोर पाटील यांना राखी बांधली.
पाचोरा येथील कट्टर राजकीय वैरी असलेल्या बहीण-भावांनी रक्षाबंधन साजरे केले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी हजर राहून वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून राखी बांधून घेतली आहे. विशेष म्हणजे मशालचिन्ह असलेली राखी वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांना बांधली.
किशोर पाटील यांनीही धनुष्यबाण चिन्ह असलेल्या बॅगमधून वैशाली सूर्यवंशी यांना रक्षाबंधनाची भेट दिली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंत केले. तर आर. ओ. तात्या पाटील यांचे राजकीय वारसदार असलेले आमदार किशोर पाटील यांनी मात्र एकनाथ शिंदे यांना साथ दिली.
तेव्हापासून या दोन्ही बहीण भावांमध्ये राजकीय तणाव हा वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय वैशाली सूर्यवंशी यांनी घेतला आहे. मात्र रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर कट्टर राजकीय विरोधी असलेले बहीण-भाऊ एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात या रक्षाबंधणांची एकच चर्चा आहे.