उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा – खासदार उन्मेष पाटील
उद्योजकांसाठी ‘इग्नाईट महाराष्ट्र’ एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
जळगाव,;- आपला उद्योग व व्यवसाय वाढीसाठी उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे केले.
उद्योग संचालनालय व जळगाव जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावतीने उद्योजकांसाठी आयोजित ‘इग्नाईट महाराष्ट्र’ एकदिवशीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार श्री पाटील बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण यांनी केले.उद्योजक अनिल कनसे, राजेंद्र गव्हारी, सिडवी, श्री. मिलींद काळे, अक्षय शाह, मनीष दुलसिन, धीरजकुमार, एम. एस. जगदाळे, एस. व्ही. मुंडे आदी उपस्थित होते.
खासदार श्री. पाटील म्हणाले, औद्योगिक विकास वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती आवश्यक आहे.
श्री. चव्हाण यांनी डीजीएफटी, सिडबी, पोस्ट ऑफीस व ओएनडीसी इ. विभागाच्या राबविण्यांत येणा-या योजनांमध्ये उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यशाळेत जैन ईरीगेशन सिस्टीम लिमिटेडचे के. बी. पाटील यांनी केळी निर्यातीबाबत सखोल मार्गदर्शन केले. उद्योजक रिषभ जैन व श्रीराम पाटील यांनी उद्योग कसा यशस्वी करावा याबाबत मार्गदर्शन केले. मुंबई मैत्री कक्षाचे अप्पर जिल्हाधिकारी उमेश महाजन यांनी ‘मैत्री कायदा ईज ऑफ डुईंग बिझनेस’ बाबत माहिती दिली.
प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी केले. आभार व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे यांनी मानले.
हा कार्यक्रम सिडबी, आयडीबीआय, एमसीईडी व उद्योग संचालनालय यांनी प्रायोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उद्योग निरीक्षक शरद लासुरकर, ललित तावडे, अनिल गाढे, श्रीमती प्रियंका पाटील व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी दिनेश गवळे यांनी परिश्रम घेतले.