उद्यापासून नाशिक अनलॉक!
उपहारगृहं, मॉल्स आणि दुकानं रात्री १० पर्यंत राहणार खुली
नाशिक:
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यानं स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अनलॉकच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय. त्यानुसार नाशिकमध्येही १५ ऑगस्टपासून दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, योगा सेंटर्स, सलून आणि औद्योगिक आस्थापना रात्री १० वाजेपर्यंत खुल्या ठेवता येणार आहेत. विशेष म्हणजे वीकेण्ड लॉकडाऊन संपूर्ण हटवण्यात आल्यानं रविवारसह सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान आस्थापना खुल्या ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. मात्र, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळं, शाळा, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस मात्र बंदच राहणार आहेत. मंगल कार्यालयांना 50 टक्के क्षमतेत अधिकाधिक 100, तर खुल्या लॉन्समधल्या लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांच्या उपस्थितीस मुभा देण्यात आलीय.
काय राहणार सुरु?
- सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू
- हॉटेल, रेस्टॉरंट 50 % क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
- दुकान, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्यांचे लसीकरण आवश्यक.
- शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश
- मंगल कार्यालयांना 50 % क्षमतेत जास्तीत जास्त 100 नागरिकांच्या उपस्थितीला
कशाला परवानगी
- खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांच्या उपस्थितीस मुभा
- खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या 24 तास सुरू ठेवता येणार
- बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी
- जिम्नॅशियम, योगसेंटर, सलून आणि स्पा 50 % क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
काय राहणार बंद
- सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील)
- धार्मिक स्थळे
- शाळा, महाविद्यालये
- कोचिंग क्लासेस
निर्बंध उठविण्यात आले असले तरी, नागरीकांनी सर्तकता बाळगावी. आजही अनेक जिल्हयात रूग्णसंख्या वाढते आहे. व्यक्तिगत पातळीवर नियम पाळूनच आपण दूरगामी परिणाम साधू शकू. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी