गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या; शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा
मुंबई : सध्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये गदारोळ होताना दिसत आहे. असे असताना आता अधिवेशनात एक हैराण करणारा प्रकार घडला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन या अधिवेशनात झोपताना दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारवर टीका करत होते. त्याचवेळी गिरीश महाजन डुलकी घेताना दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या मागच्या बाजूला आशिष शेलार बसलेले होते.
गिरीश महाजन यांचा सभागृहातला डुलकी घेतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लाईव्ह टेलिकास्टच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालू अधिवेशनात गिरीश महाजन डुलक्या घेत असल्यामुळे सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केले जात आहे.
देवेंद्र फडणवीस गांभीर्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलत होते. यावेळी त्यांच्या मागच्याच बाकावर बसलेले गिरीश महाजन चक्क डुलक्या घेत होते. दरम्यान हा प्रकार आशिष शेलार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हाताच्या कोपऱ्याने गिरीश महाजनांना धक्का दिला.
आशिष शेलारांचा धक्का लागताच गिरीश महाजन खडबडून जागे झाले. तसेच काहीच झालं नसल्यासारखं घोषणा देऊ लागले. पण हा सर्व प्रकार सभागृहातील कॅमेऱ्यात कैद झाला होता. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तसेच आधी सभागृहात चर्चा सुरु असताना गिरीश महाजन फिरत फिरत सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले होते. त्यावर प्रकाश सोळंके यांनी आक्षेप घेतला. महाजन सत्ताधारी पक्षात का आले? असा सवाल सोळंकी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ते विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसलेले होते.