17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती!
राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे अशा भागांमधील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र आता या जीआरला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
कोरोना रुग्ण कमी होत असले तरीही प्रादुर्भाव अजुनही कायम आहे. यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. हे सर्व धोके लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असेही काहींचे मत आहे. यामुळेच टास्क फोर्सच्या बैठकीतही शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आहे. दोन दिवसातच सरकारने निर्णय बदलल्यामुळे राज्य सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ही अनेक जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली होती. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 10 ऑगस्ट रोजी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढला होता. 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 ते 7 तर शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार होते.