जळगाव – राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढत असलेली उष्णतेची तीव्रता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याने हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले. रात्रीचे तापमानही 26 अंशांवर स्थिर असल्याने नागरिकांना दिवसासोबत रात्रीही उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिकच्या हवामानाच्या इतिहासात 2011 पर्यंत तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम शहरावर स्पष्टपणे दिसून येत आहे. 28 एप्रिल 2019 रोजी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी नोंदवलेले 42 अंश तापमान हे दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान ठरले आहे.
उन्हाच्या झळांमुळे दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शांतता पसरलेली दिसून येत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने नाशिक जिल्ह्यासाठी 13 मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला असून, पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा तब्बल 46 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या करपून जात असून शेतीची कामेही मंदावली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हिंदी महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानवाढ आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील 60 ते 65 पूर्व रेखांशादरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनच्या हालचालींना पोषक वातावरण तयार होत आहे.