मुक्ताईनगरमध्ये दरोड्याचा डाव उधळला; तिघे पोलिसांच्या जाळ्यात
मुक्ताईनगर : दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आंध्र प्रदेशातील तिघांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एस. एस. कॉलेज परिसरात करण्यात आली.
पोलिसांना एस. एस. कॉलेज परिसरात दोन मोटारसायकलींवरून पाच अनोळखी व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी पथकाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता संशयितांपैकी तिघे आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे मेकल प्रसन्नकुमार मेकला दास (रा. करपल्ला थिप्पा, बोगले धामा वरम, जि. नेल्लूर), धरसिंगी देख घोडींडी ऊर्फ प्रसिद्ध प्रसाद गुट्टीडी (रा. बिट्टरगुंडा, जि. नेल्लूर) आणि मेकल विरास्वामी कोंडाया (रा. बिट्टरगुंडा, जि. नेल्लूर), अशी आहेत. हे तिघेही आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि ५ हजार ३०० रुपये रोख असा एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय लोखंडी छऱ्यांचे १०५ नग, एक स्क्रू ड्रायव्हर, दोन कापडी टोप्या, टी-आकाराचे खाच असलेले लोखंडी हत्यार आणि वेगवेगळ्या क्रमांकांच्या १० नंबर प्लेट्सही जप्त करण्यात आल्या.
गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी इतर ठिकाणी घरफोडी, चोरी किंवा दरोड्यासारखे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य दोघांचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव परिमंडळ आणि मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी आमोद बच्छाव, असिम तडवी, संतोष पवार, रवींद्र धनगर, मकरंद महाजन, जितेंद्र चव्हाण आणि गोविंद पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय बनसोडे करीत आहेत.