DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका! ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सहा आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, वाळू आणि वाहने असा एकूण ३२ लाख ४७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कासोदा आणि पारोळा पोलिसांनी ही कारवाई केली.

नदीपात्रातून वाळूची पातळी कमी झाल्याने अवैध वाळू उत्खनन व चोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार २६ ऑक्टोबर रोजी कासोदा आणि पारोळा पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली. कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीपात्रातील गावाच्या वेशीजवळ, मंदिराजवळ तसेच एरंडोल तालुक्यातील करदन शिवारात अवैध वाळू वाहतुकीची प्रकरणे उघडकीस आली. याशिवाय हनुमंतखेडेसीम शिवारातील गिरणा नदीपात्राजवळ, खुर्शी हॉटेल परिसरातही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणांत वाळूने भरलेले आयशर वाहन, टाटा डंपर तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली. पारोळा पोलिसांनी किसान कॉलेज परिसरात, जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळही कारवाई केली. या ठिकाणी पाच ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव परिमंडळाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.