आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर !
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2022च्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर पुढच्या महिन्यात म्हणजेच 11 सप्टेंबरला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
महत्वाचे म्हणजे यावेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने यंदाचा आशिया कप टीम इंडियासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार आहेत. यंदाचा आशिया कप श्रीलंकेमध्ये होणार होता. पण श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.