एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित; अजित पवारांचे निर्देश
मुंबई : वेतनाअभावी कर्जबाजारी झालेल्या व आत्महत्येची वेळ आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अखेर राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन देता यावं यासाठी सरकारनं ५०० रुपये वितरीत केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर तातडीनं हा निधी महामंडळाला वितरीत करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे.
पगाराअभावी काही दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री इथं एका एसटी चालकानं आत्महत्या केली होती. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यानं चिठ्ठीत नमूद केलं होतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. कर्मचाऱ्यांनी आगार बंद करून महामंडळाचा निषेध केला होता. विरोधी पक्षांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सर्व बाजूंनी दबाव आल्यानंतर सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.