जळगाव : सरकारी कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या बिलापोटी मिळणा-या धनादेशाच्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम लाचेच्या स्वरुपात मागणी करणारा वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुकेश हरी महाजन असे लाच मागणा-या वन अधिका-याचे नाव आहे. औरंगाबाद येथील सरकारी कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर एसीबीकडून सदर कारवाई करण्यात आली आहे.
शासकीय कंत्राटदाराने रावेर तालुक्यात वन विभागाची विविध कामे केली आहेत. केलेल्या तीन कामांपैकी पाल येथील एक काम पुर्ण झालेले असुन त्या कामाचा मोबदला म्हणून 26,00,00/- रूपयांचा धनादेश त्यांना मिळाला आहे. मात्र लोहारा येथील कामाचा मोबदला त्यांना मिळालेला नाही. या कामाचा धनादेश काढण्यासाठी अगोदरच्या पाल येथील व आताच्या लोहारा येथील कामाच्या एकूण रकमेच्या पाच टक्के रक्कम (1 लाख 30 हजार) लाचेच्या रुपात वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश हरी महाजन यांनी तक्रारदाराकडे मागितली. तडजोडीअंती 1 लाख 15 हजार देण्या घेण्याचे ठरले.
दरम्यान पंचासमक्ष पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला मुकेश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.