क.ब.चौ. विद्यापीठाचा 24ला दीक्षांत समारंभ
जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ २४ मे रोजी होत आहे. यात २० हजार ७५ स्नातकांना पदवी बहाल केली जाईल; तर गुणवत्ता यादीतील ९८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता दीक्षांत समारंभ होईल. समारंभास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोशियारी हे अध्यक्षस्थानी राहतील ऑनलाइन उपस्थित राहत दीक्षांत भाषण करतील. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता (NAAC) बंगळूरचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून स्नातकांना ऑनलाइन संबोधित करतील. दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे ऑनलाइन उपस्थित राहतील. या शिवाय पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार हे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात २० हजार ७५ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ९ हजार ३२२ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार ७६२ स्नातक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे ४ हजार ५०८ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे ४८० स्नातकांचा समावेश आहे. स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ४०४, मु. जे. महाविद्यालयाचे ४६९, प्रताप महाविद्यालयाचे ३८४, जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे ४०२ अशी एकूण १ हजार ६९५ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ९८ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. यामध्ये ६५ विद्यार्थिनी व ३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २४ हजार १३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २१४ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत.
पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव तसेच स्नातकाच्या आईचे नाव आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या साहाय्याने मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. तसेच विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. स्नातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवसी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरिता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.