जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजराह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन
जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा
ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन
चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण
जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी) – ‘आम्ही पाण्याचा वारेमाप वापर केला व करीत आहोत पुढील पिढीसाठी पाणी बचतीची सुबुद्धी आपल्या सर्वांना मिळो…’ असे विचार डॉ. सुदर्शन आयंगार यांनी व्यक्त केले. येथील भाऊंच्या उद्यानातील ऍम्फी थिएटरमध्ये जागतिक जल दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशन तर्फे ह.भ.प हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन आणि जागतिक जल दिनानिमित्ताने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमास गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुदर्शन आयंगार, डॉ गीता धरमपाल, हभप हृषीकेश महाराज व्यासपीठावर होते.
पाण्याचे महत्व सांगणारे श्रवणीय कीर्तन…
ह.भ.प. हृषीकेश महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेत ‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती’ असा तुकोबांचा अभंग कीर्तन निरूपणासाठी घेतला होता. संत तुकाराम महाराजांचा संदेश, त्याचा अर्थ त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितला. साडेचारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी पाणी वाचविण्याचा उपदेश केला. आज्ञा, अनुज्ञा, अर्थानुपत्ती याबाबत सांगितलं.
शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील 395 विद्यार्थी जागतिक जलदिवसाच्या निमित्त चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. पाणी या विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक चित्रांच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला. त्यातून 12 विजेते विद्यार्थी निवडले गेले. त्यात पहिल्या गटातून यादे देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तेजस प्रमोद जोगी तर दुसऱ्या गटातून विद्या इंग्लिश मीडिया स्कूलची निकिता देवराज पाटील ही पहिली ठरली. दोन विशेषगटातुन विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर, सावखेडाचे तेजस सोनवणे व भूषण इंगळे यांची निवड झाली.
पहिल्या गटातील द्वितीय- विशाल जैन, (मु. जे. महाविद्यालय), वैष्णवी इखे (स्वामी समर्थ विद्यालय, कुसुंबा), ललित सदाफळे, (न्यु इंग्लिश स्कूल, जळगाव), तनुश्री प्रकाश भारोटे, (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), तर दुसऱ्या गटातील तनिष्का संदानसिवे (ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूल), आदयाशा परिदा (विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल), नव्या दोशी (किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल), तोशल आमले (ब गो शानभाग विद्यालय) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सुशील चौधरी, प्रदीप पवार यांचा आणि ज्या शाळेतील विद्यार्थी सहभाग अधिक होता त्या शाळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
निवडक चित्रांचे प्रदर्शन
आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातील काही निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानात भरविण्यात आले, त्याचे उद्घाटन डॉ. सुदर्शन आयंगार, डॉ. गीता धरमपाल, ह.भ.प. हृषीकेश महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनासाठी 120 विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड झालेली आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळेत प्रेक्षकांना बघता येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पारितोषिक सोहळ्याचे संचालन गिरीष कुळकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन आनंद पाटील यांनी केले.