DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

देवगिरी अखेर अजित पवारांच्याच हवाली, फडणवीसांची अशीही दिलदारी

मुंबई :  सत्ता गमावल्यानंतर राज्यकर्त्यांमध्ये सरकारी स्तरावर अनेक बदल होत असतात. सत्तेत असताना मिळालेले अधिकार आणि आणि शासकीय निवासस्थानसुद्धा सोडावे लागते. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे असे एकमेव राजकारणी ठरणार आहेत, ज्यांना स्वतःचं राहतं घरं सोडावं लागणार नाही. कारण मलबार हिलमधील देवगिरी बंगला अजितदादांकडे कायम ठेवण्याचा निर्णयच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय. त्यावर आता शिंदे-फडणवीस सरकारनंही शिक्कामोर्तब केले आहे. दोस्ती आणि यारीसाठी देवेंद्र फडणवीस ओळखले जातात, तीच दिलदारी अजितदादांना देवगिरी बंगला देऊन देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलीय.

देवगिरी हा बंगला यापूर्वी सधारणपणे उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांना वाटप केल्याचे दिसून येते. परंतु आता हा बंगला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वितरीत करावयाचा निर्णय शासन स्तरावर घेतला आहे. या निर्णयाचे पूर्वोधाहरण होणार नाही. यापुढे तो पायंडा पडणार नाही. या अटीच्या अधीन राहून सदर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते विधानसभा यांनी पदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांना वाटप केलेला बंगला 15 दिवसांच्या कालावधीत रिक्त करून देणे बंधनकारक राहील, असंही शासन निर्णयात म्हटलं आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे सरकारी बंगले वितरीत करण्याचे अधिकार असतात आणि सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असतो. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी सरकारवर फडणवीसांचा प्रभाव अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती, त्यावेळी देवगिरी पुन्हा मिळावा यासाठी पत्राद्वारे विनंतीही केली होती.

 

जवळपास अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या उपमुख्यमंत्रिपदाच्या काळातही अजित पवारांनी देवगिरी या शासकीय बंगल्यावरही वास्तव्य केलंय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून देवगिरी बंगला त्यांच्याकडेच राहावा, अशी मागणी केली होती. अजितदादांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिंदे-फडणवीस सरकारनं देवगिरी बंगला त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. खरं तर या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांच्या मैत्रीला जागल्याचंही सांगितलं जातंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेसुद्धा चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी करत दीड दिवसाचे उपमुख्यमंत्रिपद मिळवण्याचा पराक्रमही अजित पवारांनी केला होता. त्यामुळे आता देवगिरी बंगला अजितदादांना देऊन पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी मैत्रीची परतफेड केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मलबार हिलस्थित हा बंगला अजित पवार यांचा सर्वात आवडता बंगला आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी काँग्रेसबरोबर आघाडी करत सत्ता स्थापन केल्यानंतर जलसंधारणमंत्री (कृष्णाखोरे विकास) असताना अजित पवारांना हा बंगला मिळाला होता. उपमुख्यमंत्री असूनही अजितदादांना देवगिरीनं नेहमीच आपलंसं केलं होतं. यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ हे रामटेकवर वास्तव्य करत असत. तर आर आर पाटील हे चित्रकूटवर उपमुख्यमंत्री असताना वास्तव्यास होते. 1999 ते 2014 अशी मिळून 15 हून अधिक वर्षे देवगिरी बंगला हा अजितदादांकडेच होता. त्यामुळे अजितदादांचे त्या बंगल्याशी वेगळेच ऋणानुबंध आहेत. आता राष्ट्रवादी विरोधी पक्षात असल्यानं विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांना सागर बंगला मिळेल, असाही अंदाज बांधला जात होता. पण तो खोटा ठरवत अजित पवारांना देवगिरी हा बंगला देण्यात आलाय.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.