पाकिस्तानात जमावाकडून गणेश मंदिरावर हल्ला करत नासधूस
पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ त्यांच्या ट्विटर वॉलवर टाकले, आहे.
पाकिस्तानात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी मंदिराला लक्ष्य केले आहे. हे प्रकरण पंजाबमधील भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या स्थानिक गणेश मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना कसे ठेचले जात आहे, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.कट्टरपंथीयांनी मंदिर पूर्णपणे उद्धवस्त केले. मूर्ती फोडण्यासही मागेपुढे पाहिले नाही. झुंबर आणि काचेची सजावटही फोडली. मंदिरावरील या हल्ल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. असे असूनही स्थानिक प्रशासन हे प्रकरण लपवण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये सर्व हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.
पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात केलेल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, ”मी रहीम यार खानच्या भोंगमधील गणेश मंदिरावर काल झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो आहे. मी अगोदरच पंजाबच्या आयजी यांना सर्व आरोपींना अटक होईल याची खबरदारी घेण्यास आणि पोलिसांच्या कोणत्याही बेजबादार वागणुकीबद्दल कारवाई करण्यास सांगितलं आहे. सरकार मंदिराचा जीर्णोद्धा देखील करेल.”
Strongly condemn attack on Ganesh Mandir in Bhung, RYK yesterday. I have already asked IG Punjab to ensure arrest of all culprits & take action against any police negligence. The govt will also restore the Mandir.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 5, 2021
पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आणि त्यांच्या पूजास्थळांवर भयावह प्रमाणात हल्ले होत असताना तेथील सरकार व सुरक्षा यंत्रणा मूक दर्शक बनल्या आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
भारताने गुरुवारी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रमुखांना पाचारण केले आणि पंजाब प्रांतातील हिंदू मंदिराची नासधूस करण्याच्या ‘निंदनीय घटनेबद्दल’ निषेध नोंदवला. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर हिंसाचार आणि त्यांच्या धार्मिक छळाच्या घटना अखंडित सुरूच आहेत, असे भारताने लक्षात आणून दिले.