DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राम भक्तांना आवाहन

नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. मात्र या सोहळ्यासाठी रामभक्तांनी येऊ नये, असे आवाहन त्यांनी आज अयोध्या येथे केले. पंतप्रधानांच्या आवाहनामागे नेमके काय आहे कारण, वाचा यावरील स्पेशल रिपोर्ट

पंतप्रधानांचे रामभक्तांना आवाहन : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन केले जाणार असून प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. दि. ३० डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा विषय सगळीकडे चर्चेत आहे. राम मंदिराशी निगडित छोट्या छोट्या घटनांनाही माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे देशभरात राम मंदिराबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून २२ जानेवारी रोजी अनेक भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी राम भक्तांनी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावे लागले.

 

अयोध्येत हॉटेल बुकिंग फुल
प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील आणि उत्तर प्रदेशमधील भाविक जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अयोध्यामधील हॉटेल, गेस्ट हाऊस आतापासूनच बुक करण्यात आले आहेत. ट्रेन आणि बस यांचेही आरक्षण काढण्यात आले आहे. गर्दीचा अंदाज घेऊन पोलिस प्रशासन सर्व खबरदारीचे उपाय राबवत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

 

५५० वर्ष वाट पाहिली, अजून काही दिवस थांबा
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी देशातील सर्व जनतेला प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊन या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची उत्सुकता असेल. पण प्रत्येकाला इथे त्याच दिवशी येणे शक्य नाही, हे तुम्ही सर्व जाणता. अयोध्येत सर्वांचे येणे कठीण आहे. त्यामुळे मी देशातील, उत्तर प्रदेशमधील सर्व राम भक्तांना विनंती करतो की, त्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ नये.”

 

अजून काही दिवस वाट पाहा
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार अयोध्येत येऊ शकता. प्रभू रामाला अडचण होईल, असे कोणतेही कृत्य राम भक्त कधीच करू शकत नाही. प्रभू राम अवतरत आहेत, तर आम्ही काही दिवस नक्कीच वाट पाहू शकतो. सर्वांनी ५५० वर्ष वाट पाहिली, तर अजून काही दिवस वाट पाहा.”

 

२२ जानेवारी रोजी दिवा लावून दिवाळी साजरी करा
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पाहतोय. अशावेळी अयोध्यावासियांमध्ये उत्साह संचारणे स्वाभाविकच आहे. मीही भारतातील प्रत्येक नागरिकाप्रमाणेच उत्सुक आहे. मी देशातील १४० कोटी नागरिकांना आवाहन करत आहे की, तुम्ही २२ जानेवारी रोजी आपापल्या घरात रामज्योती म्हणजेच दिवा लावून दिवाळी साजरी करा.”

 

उद्घाटन सोहळ्यासाठी आठ हजार जणांना निमंत्रण
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर ८००० व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांंनाही निमंत्रित केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांसह देशभरातून संत, अध्यात्मिक गुरू, सेलिब्रिटी, सनदी अधिकारी, संरक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

राम मंदिर आंदोलनादरम्यान ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांनाही श्री राम जन्मभूमी ट्रस्टने यावेळी निमंत्रित केले आहे. योग गुरू रामदेव, ४००० संत-साधू, लेखक, पत्रकार आणि वैज्ञानिकांनाही उदघाटनासाठी निमंत्रित केल्याचे सांगण्यात येत आहे.

श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, ५० देशांमधून एका प्रतिनिधिला निमंत्रित करण्याचा आमचा विचार आहे. राम मंदिरासाठी आंदोलन करताना ५० कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना यावेळी सन्मानाने निमंत्रित केले आहे. तसेच वैज्ञानिक, लेखक आणि न्यायाधीशांनाही आम्ही बोलावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत पद्म पुरस्कार विजेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.