महाराष्ट्र अंधारात गेला तरीही ‘या’ १४ गावात राहणार उजेडच उजेड ; त्यामागचं हे आहे कारण?
मुंबई : राज्यातील महावितरणचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले असून याचा परिणाम अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासूनच दिसू लागला आहे. राज्यातील अनेक भागातील बत्तीगुल झाली आहे. येणाऱ्या ७२ तासात विजेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांना भेडसावत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील १४ गावे मात्र निवांत आहेत.
नेमकी कोणती आहेत ती गावे?
महाराष्ट्रात सुरू असलेल्या संपाचा या गावांना तीळमात्रही फटका बसलेला नाही. सीमावर्ती भागात असलेल्या या गावांना थेट तेलंगणातून वीज पुरवठा सुरू आहे. चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील १४ गावे सीमा वादात अडकली आहेत. लेंडीगुडा, भोलापठार, नारायण गुडा, ईसापुर, अंतापुर, पद्मावती, इंदिरानगर, परमडोली, मुक्कदमगुडा, कोटा, शंकरलोधी, महाराज गुडा, लेंडीजाळा आणि कामतनगर अशी गावांची नावे आहेत.
१४ गावावर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगत आहेत. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती, अंगणवाडी, शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते.
चौदा गावांना तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा केला जातो. तेलंगणा राज्यातील आसिबाबाद जिल्ह्यात येणाऱ्या केरामेरी मंडल ( तालुका ) येथून १४ गावांना वीज पुरवठा करण्यासाठी २० किमी अंतर वीज वाहिनी पसरवण्यात आली आहे. या चौदा गावांची लोकसंख्या अंदाजे ३५०० आहे. तर कुटुंब संख्या १२०० चा आसपास आहे.
या गावात केवळ तेलंगणाचीच वीज आहे असे नाही. महाराष्ट्र सरकारनेही या गावात वीज वाहिन्या पसरविल्या आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील वापरलेल्या विजाचे देयक येतील नागरिक भरतात. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रात विज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाच्या या गावांना कुठलाही फटका बसणार नाही.