१८ वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस मिळणार; सरकारकडून नियोजन सुरू
मुंबई : चीनसह अनेक देशांत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे हिंदुस्थानही ऍलर्ट मोडवर आला आहे. केंद्र सरकारने विषाणूची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी खबरदारी घेतली आहे.
याच अनुषंगाने आता देशातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानुसार नियोजनही सुरू करण्यात आले आहे.
देशात सध्या 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी व इतर फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस दिला जात आहे. मात्र अनेक देशांत ओमायक्रोनच्या सब-व्हेरिएंटने कोरोनाची चिंता पुन्हा वाढवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार बुस्टर डोससाठीची वयाची मर्यादा शिथील करण्याचा विचार करीत आहे. त्यानुसार 18 वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. हा डोस मोफत असेल की त्यासाठी पैसे आकारले जातील, याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने सोमवारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
ओमायक्रोनच्या बीए .2 या सब – व्हेरिएंटमुळे अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत . हा सब – व्हेरिएंट अधिक गंभीर नसला तरी अधिक संसर्गजन्य आहे , असा इशारा तज्ञांनी दिला आहे . त्यामुळे सरकार सतर्क झाले आहे .