सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत
तातडीने रुग्णालय गाठून जखमींची मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विचारपूस
मुंबई : सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होउन बस गडाच्या दरीत कोसळल्याने अपघात झाला. त्यात अमळनेर तालुक्यातील महिला ठार झाली व तालुक्यातीलच इतर १४ जण जखमी झाल्याने त्या अपघाताची माहिती समजतात मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली.
बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी होते अशी माहिती मिळताच मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून तातडीने नाशिक येथे नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून मोफत उपचार करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. रुग्णांना तातडीने मोफत उपचार सुरू होऊन संपूर्ण व्यवस्था झाल्याने त्यांनी मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले.
दरम्यान आज मतदारसंघातील मंत्री यांच्यामुळे आलेल्या या कठीण परिस्थितीत आम्हाला खूप मोठा आधार मिळाला,प्रशासनाकडून आम्हाला खूप मोठी मदत झाली अशी माहिती अपघातातील जखमींच्या नातलगांनी व्यक्त केली.