जामनेरात लाचखोरीला लगाम; तांत्रिक सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर । येथील पंचायत समितीमधील एका कंत्राटी तांत्रिक सहाय्यकाने सिंचन विहिरीचे पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात तीस हार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत संशयित कर्मचाऱ्याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सागर अशोक नावकर (वय ३२ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी तांत्रीक सहाय्यकाचे नाव आहे. तो जामनेर येथील पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर ‘तांत्रिक सहाय्यक’ म्हणून कार्यरत आहे. तो मूळचा गणपतीनगर, तळेगाव (ता. जामनेर) येथील रहिवासी आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून, त्यांच्या शेतावर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (गां.रा.ग्रा.रो.ह.यो.) अंतर्गत सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समितीकडून एक सिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीची अधिकृत स्थळपाहणी करण्यापूर्वीच संशयित सागर नावकर याने गावातील रोजगार सेवकामार्फत तक्रारदाराकडून ३०,००० रुपये स्वीकारले होते आणि त्यानंतरच स्थळ पाहणी करून फोटो काढले होते.
त्यानंतर तक्रारदाराला पंचायत समितीकडून वेळोवेळी ६०,९६६/- रुपये एवढी रक्कम मिळाली. यात नावकर याने जागा बदल झाल्याचे कारण देत पुन्हा तीस हजारांची लाच मागितली. तथापी, संबंधीत तक्रारदाराने ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. ०६/०४/२०२६, दि. ०९/०४/२०२६ आणि दि. १४/०५/२०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान संशयित सागर नावकर याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडे ३०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाच मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, २२ जून २०२६ रोजी त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीमती रेश्मा अवतारे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि भूषण पाटील यांच्या पथकाने केली.