DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अपघातग्रस्त कारमधून गुटख्याची तस्करी

दोन आरोपींना अटक; ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंभोरा : अपघातग्रस्त चारचाकी वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने निंभोरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, वाहनासह एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार आणि या व्यवसायात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ४.४५ वाजता निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदगुजर फाट्याजवळ, ता. रावेर येथे एका चारचाकी वाहनाला अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मिरा देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी वाहनातील साहित्याची तपासणी करून प्रतिबंधित पदार्थ जप्त केले.

या कारवाईत अजिम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुबश्शिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशिदीजवळ, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा व पानमसाला, तसेच हुंडाई कंपनीची आय-२० कार (क्रमांक एमएच-२६-व्ही-४४२३) यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटखा व पानमसाल्याची किंमत ४ लाख ९० हजार ४४० रुपये, तर वाहनाची किंमत २ लाख ८० हजार रुपये असून, एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २२३, २७४, २७५ व ३५१(३) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला, त्याचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास निंभोरा पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक मिरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे तसेच पोलीस कर्मचारी आणि तपास पथकातील सदस्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपासात प्रतिबंधित पदार्थांच्या पुरवठा साखळीबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.