DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील

चार हजार वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; भक्तिमय वातावरणात वारीचा प्रस्थान सोहळा

पाळधी/जळगाव  : “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याच्या भव्य सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर होते.

जी.एस. ग्राऊंडवर दुपारपासूनच हजारो वारकरी एकत्र जमले होते. नोंदणीकृत भाविकांना ओळखपत्रे, प्रवास पास व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जी.एस. ग्राऊंडवरून नेहरू चौक मार्गे रेल्वे स्थानकापर्यंत भव्य पालखी-दिंडी काढण्यात आली. टाळ, मृदंग, वीणा, अभंग, फुगड्या, रिंगण, भगव्या पताका आणि “ज्ञानोबा-तुकोबा”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” तसेच “माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक हा मार्ग जणू पंढरीच्या वारीचेच रूप धारण करून बसला होता.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः टाळ हातात घेऊन दिंडीत सहभाग नोंदविला. वारकऱ्यांसोबत अभंग गात त्यांनी फुगडीही खेळली. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि इतर वारकऱ्यांची विचारपूस केली. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व सुविधांची पाहणी करून रेल्वे सुटेपर्यंत ते स्थानकावर उपस्थित राहिले. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून त्यांनी विशेष रेल्वेला पंढरपूरकडे रवाना केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि जीपीएस मित्र परिवाराने अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केले. नोंदणी, आसनव्यवस्था, डॉक्टरांचे पथक, प्रथमोपचार पेट्या, पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन, स्वयंसेवक, पंढरपूरमधील निवास, महाप्रसाद, दर्शन व्यवस्था आणि परतीच्या प्रवासापर्यंत सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात आले. विशेष रेल्वेच्या प्रत्येक डब्यात दोन स्वयंसेवक, वैद्यकीय मदत, औषधे, चहा-नाश्ता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सर्व वारकऱ्यांचा विमाही उतरविण्यात आला.

पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यक्रमादरम्यान आणखी एक भावस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “विठू माऊली तू माऊली जगाची…” हे विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले गीत सादर केले. त्यांच्या स्वरांना हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात उत्स्फूर्त साथ दिली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” या अखंड नामगजराने दुमदुमून गेला. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

यावेळी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, समाधान महाराज भोजेकर, ज्ञानेश्वर महाराज, परमेश्वर महाराज पाळधीकर, पांडुरंग महाराज, अनिल महाराज, मयूर महाराज, गजानन महाराज धरणगावकर, मंगलसिंग महाराज, लाला महाराज, विठोबा महाराज, कृष्णा महाराज यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, विविध लोकप्रतिनिधी, टाळकरी, माळकरी, वारकरी आणि मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित होते. विशेष रेल्वे पंढरपूरच्या दिशेने रवाना होताच रेल्वे स्थानक “ज्ञानदेव… तुकाराम…”च्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.