गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार
चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
चाळीसगाव : शेतकरी समृद्ध होणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले गिरणा नदीवर बलुन बंधाऱ्याऐवजी राज्य शासनाच्या अखत्यारीत सुमारे ₹९०० कोटी खर्चून पारंपरिक पद्धतीचे आठ बंधारे उभारले जाणार आहेत. लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, या कामांमुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आणि धरणगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनाचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली.

आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ६० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य लोकार्पण सोहळा नूतन पंचायत समिती प्रशासकीय इमारत परिसरात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात पंचायत समितीच्या नूतन इमारतीसह टाकळी प्र. चा. गावासाठी गिरणा-जामदा बंधाऱ्यावरून ₹२१.३२ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी निवासस्थाने, ‘रायगड’ व्हीआयपी शासकीय विश्रामगृह, सहायक दुय्यम निबंधक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी-तहसीलदार निवासस्थाने यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ₹२६ कोटींच्या अत्याधुनिक उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन लोकांसाठी सातत्याने काम करणाऱ्यांचे समाज कौतुक करतो. आमदार मंगेश चव्हाण यांचे काम हेवा वाटावा असेच असून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने विकासकामांना वेग आला आहे. पाणीपुरवठा योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून शासन सर्व भागांच्या संतुलित विकासासाठी कटिबद्ध आहे.
कार्यक्रमास आमदार मंगेशदादा चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर,
लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर भिकनराव पाटील, उपसभापती राहुल पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुळकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, जिल्हा परिषदेचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगावच्या भौगोलिक रचनेचा उल्लेख करताना चाळीसगाव ते जळगाव अंतर सुमारे १०० किमी असून तालुक्यातील गुजरदरी, कलमडू, कुंझर व डोंगरपट्ट्यातील दुर्गम गावांतील नागरिकांना जळगावला जाणे कठीण जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, आरटीओ कार्यालय, आदी जिल्हास्तरीय शासकीय सुविधा टप्प्याटप्प्याने चाळीसगावमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमानंतर नागरिकांनी नव्याने उभारलेल्या प्रशासकीय व पायाभूत सुविधांची पाहणी केली. चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने हा दिवस ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. सुनील निकम यांनी मानले.