एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकलींचा अवघ्या एका दिवसात छडा लावत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ₹४५ हजार किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलैच्या रात्री ते २७ जुलैच्या पहाटेदरम्यान दत्तनगर, मेहरूण येथील रहिवासी मीसमीर खान नईम खान तसेच शेरा चौक येथील फारुख इंकवाल बागवान यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान तांबापुरा, मेहरूण परिसरात सापळा रचून साहील मोहम्मद तडवी (वय २३, रा. तांबापुरा, मच्छी बाजार, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने दोन्ही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH-19-BP-4794) व हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH-19-AM-1670) या एकूण सुमारे ₹४५ हजार किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ रमेश चौधरी, पोना प्रदीप चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, योगेश घुगे, सुभाष सावळे आदींच्या पथकाने केली.