शालार्थ घोटाळ्याच्या तपासाची व्याप्ती वाढली; अटकेच्या भीतीने अनेक संस्था चालक संपर्काबाहेर?
जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाने आता निर्णायक वळण घेतले असून, जळगाव जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थाचालक अटकेच्या भीतीने संपर्काबाहेर गेल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. नाशिकच्या विशेष तपास पथकाने जामनेर तालुक्यातील दी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे संचालक संजय भास्करराव गरुड (वय ६७) यांना सोलापूर येथून अटक केल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या अटकेमुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील २०० हून अधिक माध्यमिक शाळांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत १,२०० हून अधिक संशयितांची ओळख पटवली असून, पाच प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संजय गरुड यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटकेच्या शक्यतेने वाढली धावपळ
संजय गरुड यांच्या अटकेनंतर तपासाची साखळी इतर संस्था आणि संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांनी स्वतःचा संपर्क मर्यादित केला असून, काही जण सुरक्षित ठिकाणी गेल्याची चर्चा आहे. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी काहींनी कायदेशीर हालचाली सुरू केल्याची माहितीही समोर येत आहे. यासाठी अनुभवी विधिज्ञांची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वी जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक झाल्यानंतरच संबंधितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आता संजय गरुड यांच्या अटकेमुळे तपासाचा फास अधिक आवळला जात असल्याचे बोलले जात असून, अनेक संस्था चालक आणि संबंधित व्यक्तींनी सार्वजनिक संपर्क टाळल्याचे सांगितले जात आहे.
१७७ संशयित शालार्थ आयडींची नोंद
विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासानुसार, संजय गरुड यांनी त्यांच्या संस्थेअंतर्गत विविध शाळांसाठी शिक्षक भरती प्रक्रियेत एका दिवसात तब्बल १७७ संशयित शालार्थ आयडी तयार करून घेतल्याचा संशय आहे. या प्रक्रियेदरम्यान देणगीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचाही तपास सुरू आहे. संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार आणि इतर पुराव्यांची पडताळणी तपास यंत्रणा करत आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे सांगितल्याचा दावा केला आहे. मात्र, तपास यंत्रणा उपलब्ध पुरावे, आर्थिक व्यवहार आणि अधिकृत नोंदींच्या आधारे पुढील कारवाई करत असल्याचे सांगितले जात आहे.
अधिकारी आणि कर्मचारीही तपासाच्या कक्षेत
या प्रकरणात केवळ शिक्षण संस्था चालकच नव्हे, तर शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि वेतन पथकातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे तपासाचा आवाका सातत्याने वाढत असून, आगामी काळात आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील काही संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित आहे. त्यांपैकी काही जण सध्या संपर्काबाहेर असल्याची चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.