DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना जळगाव पोलिसांचा दणका!

२६ मॉडिफाईड सायलेन्सर जप्त; रोड रोलरखाली टाकून केले नष्ट

जळगाव : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या तसेच मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेट मोटरसायकलस्वारांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाईचा दणका दिला आहे. या कारवाईत २६ बुलेट मोटरसायकलींचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, जप्त केलेले सायलेन्सर रोड रोलरखाली टाकून नष्ट करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्कश आवाज करणाऱ्या आणि कंपनीच्या मूळ स्वरूपात बदल करून मॉडिफाईड सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान २६ बुलेट मोटरसायकलींवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.

२५ ऑगस्ट रोजी कारवाई; सायलेन्सर केले नष्ट
एमआयडीसी पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जप्त करण्यात आलेल्या मॉडिफाईड सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे कर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

ध्वनिप्रदूषण टाळण्याचे पोलिसांचे आवाहन
मॉडिफाईड सायलेन्सरमुळे निर्माण होणाऱ्या कर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे वाहनचालकांनी कंपनीने निर्धारित केलेले मूळ सायलेन्सरच वापरावेत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे. मॉडिफाईड किंवा कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांची तपासणी आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश अहिरे, अफजल बागवान आणि फिरोज तडवी यांनी कारवाईत सहभाग घेतला. “कर्कश आवाज नाही, शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध जळगाव हवे. वाहतूक नियम पाळा, ध्वनिप्रदूषण टाळा आणि नागरिकांचा त्रास टाळा,” असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.