DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तिबेटमधून आलेल्या विनाशकारी महापुराने नेपाळमध्ये हाहाकार!

१०५ भारतीयांसह २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता; जलविद्युत प्रकल्प, पूल आणि शेकडो वाहने वाहून गेली

काठमांडू : वृत्तसंस्था

चीनच्या तिबेटमधून आलेल्या अचानक आणि विनाशकारी पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात मोठा हाहाकार उडाला आहे. भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिमुरे आणि स्याब्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला असून अनेक घरे, पूल, वाहने आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्याचे वृत्त आहे. एका जलविद्युत प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले आहे. एपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक आणि पर्यटक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, १०५ भारतीय नागरिकांसह एकूण २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

सीमा चौकीवरील नऊ पोलीस कर्मचारीही बेपत्ता
तिमुरे सीमा चौकीवर तैनात असलेले नऊ पोलीस कर्मचारीही पुराच्या तडाख्यानंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २५ जणांना सुरक्षित बाहेर काढले असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू आहे. आपत्तीग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य वेगाने करण्यासाठी १४ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. मात्र, पुरामुळे स्थानिक हेलिपॅडचे मोठे नुकसान झाल्याने बचावकार्याला अडथळे निर्माण होत आहेत.

हेलिकॉप्टरलाही उतरता आले नाही
तिमुरे परिसरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आलेले हेलिकॉप्टर सुरक्षित ठिकाण न मिळाल्याने काठमांडूला परतले. स्थानिक हेलिपॅड पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हेलिकॉप्टर उतरवणे शक्य झाले नाही.एका पायलटने ‘काठमांडू पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, वरून पाहिल्यानंतर तिमुरे गावाचा मोठा भाग दिसत नव्हता. त्रिशूली नदीचे पाणी अत्यंत वेगाने वाढले. जणू काही अडवून ठेवलेली नदी अचानक फुटून बाहेर पडावी, अशा वेगाने पाण्याचा प्रवाह वाढल्याचे पायलटने सांगितले.

बिहारमधील आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
नेपाळमधील या महापुराचा परिणाम भारतातही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या आठ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गंडक नदीत अचानक सुमारे तीन मीटर उंचीची पुराची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हिमनदीचे सरोवर फुटल्याचा संशय
रसुवा परिसरात गेल्या २४ तासांत सात मिलिमीटरपेक्षाही कमी पाऊस झाल्याने स्थानिक पावसामुळे एवढा मोठा पूर आला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिबेटमधील हिमनदीचे सरोवर फुटल्यामुळे (GLOF) भोटेकोशी नदीला अचानक महापूर आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.२०२० मध्ये ICIMOD-UNDP यांच्या अभ्यासानुसार भोटेकोशी खोऱ्यात तब्बल १२२ हिमनदी सरोवरे असल्याचे आढळून आले होते. यापैकी नेमके कोणते सरोवर फुटले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर नेमका कुठून आला, याचा शोध घेण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि तांत्रिक तपासणीचा आधार घेतला जात आहे.

तिमुरेमध्ये मोठ्या नुकसानीची शक्यता

पूर आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे तिमुरे परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी संपर्क तुटला असून मदतकार्य पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. बेपत्ता नागरिक आणि पर्यटकांचा शोध घेण्याबरोबरच मृतांची संख्या आणि मालमत्तेच्या नुकसानीचा नेमका आकडा निश्चित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. नेपाळमधील या भीषण आपत्तीमुळे एकीकडे मोठ्या जीवितहानीची भीती निर्माण झाली असताना, दुसरीकडे भारतातील बिहारमध्येही पुराच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.