महाराष्ट्राच्या राजकारणात खडसेंचे योगदान महत्त्वाचे!
शरद पवार यांचे गौरवोद्गार ; कोथळीत रंगला अमृत महोत्सव सोहळा
कोथळी, ता. मुक्ताईनगर : ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथळी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित हजेरी लावली. त्यामुळे खडसे यांच्या ७५व्या वर्षातील पदार्पणाचा हा सोहळा केवळ कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रम न ठरता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव देवकर, दिलीप कांबळे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील, आमदार किशोर दराडे, माजी आमदार रमेशदादा चौधरी, शिरीषदादा चौधरी, दिलीप मोरे, कैलास पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, प्रसन्नजीत पाटील, रोहिणीताई खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर दिंडी सोहळ्याद्वारे त्यांना व्यासपीठापर्यंत नेण्यात आले. संत मुक्ताईची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आमदार एकनाथराव खडसे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


‘नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही’
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करताना उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक पायाभरणी करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा उल्लेख केला. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अभ्यासपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडले. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन योजना मार्गी लावण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. ज्या पक्षात काम केले, त्या पक्षाशी निष्ठा राखत खडसे यांनी कार्य केले. राजकीय मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माणसे जोडण्याची त्यांची क्षमता विलक्षण असून, नाथाभाऊंसारखा लोकनेता पुन्हा निर्माण होणे कठीण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
‘आक्रमक नेतृत्वाची महाराष्ट्राला कायम आठवण राहील’
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खडसे यांच्यासोबतच्या दीर्घ राजकीय संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. १९९० मध्ये आपण दोघेही प्रथमच विधानसभेत निवडून आलो, असे सांगत त्यांनी खडसे यांच्या विधिमंडळातील आक्रमक कार्यशैलीचे कौतुक केले. आपण विधानसभा अध्यक्ष असताना विरोधी पक्षनेते म्हणून खडसे सरकारला धारेवर धरत आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असत. राजकीय मतभेद असूनही पूर्वी व्यक्तिगत संबंध आणि परस्पर सन्मान टिकून होता. सध्याच्या राजकीय वातावरणात ही बाब कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. रक्षा खडसे आणि रोहिणीताई खडसे पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाल्याचा उल्लेख करत वळसे पाटील यांनी खडसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले यांच्या कवितेतून शुभेच्छा
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खडसे यांच्याशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांचा उल्लेख करत त्यांनी मुक्ताईनगर, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात खडसे यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. राजकारणातील वैचारिक मतभेद हे व्यक्तिगत संबंधांमध्ये अडथळा ठरू नयेत. राजकीय संघर्ष असला तरी परस्परांचे संबंध जपले पाहिजेत, असे आठवले म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी लोकशाहीच्या चौकटीत एकत्रितपणे देशहितासाठी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री असल्याने सध्या शरद पवार यांच्या राजकीय आघाडीसोबत जाणे शक्य नसल्याचे सांगत आठवले यांनी आपण आणि खडसे वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांवर असल्याचे स्पष्ट केले.

‘पवारांनी आसरा दिला नसता तर राजकारणाच्या पडद्याआड गेलो असतो’
सत्काराला उत्तर देताना एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. संत मुक्ताईला अभिवादन करून त्यांनी मनोगताला सुरुवात केली. जनतेने आजवर आपल्यावर भरभरून प्रेम केले असल्याचे सांगताना १९७८ मधील पहिल्या निवडणुकीची आठवण त्यांनी सांगितली. त्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाल्याचे त्यांनी नमूद केले.
१९९०च्या दशकातील राजकीय वातावरणाचा संदर्भ देत खडसे म्हणाले की, विरोधी पक्षात असतानाही जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्यांशी चांगले संबंध होते. राजकीय मतभेद असूनही एकमेकांना सहकार्य करण्याची भावना त्यावेळी होती. पूर्वीच्या राजकारणात संघर्ष तीव्र असला तरी व्यक्तिगत वैमनस्याला स्थान नव्हते. आजच्या राजकारणातील बदल पाहून वेदना होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भाजपसाठी अनेक दशके प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगत खडसे यांनी जलसंपदा मंत्री म्हणून केलेल्या कार्याचाही उल्लेख केला. राजकीय आयुष्यात अनेक संकटे आली. मात्र, त्या काळात शरदचंद्र पवार यांनी दिलेला आधार आपण कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले. ‘योग्य वेळी पवारांनी आशीर्वाद आणि आसरा दिला नसता तर राजकारणाच्या पडद्यामागे फेकले गेलो असतो. काही काळ मी ब्रेकवर होतो; पवारांनीच पुन्हा राजकीय प्रवाहात आणले,’ अशा भावना खडसे यांनी व्यक्त केल्या.
महाजन-मुंडे-फुंडकरांच्या आठवणींना उजाळा
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांसह राजकीय संघर्षांच्या आठवणीही खडसे यांनी सांगितल्या. २००० ते २०१४ या कालखंडात राज्यात भाजपची सत्ता नसतानाही या नेत्यांनी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्याच पायावर आज भाजपला राज्यात चांगले दिवस पाहता आले, असे खडसे म्हणाले. महाजन आणि मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि सध्याचे राजकारण यात मोठा बदल झाल्याचे सांगताना त्यांनी आजची राजकीय परिस्थिती पाहून मनाला वेदना होत असल्याचे नमूद केले.
पुत्राच्या निधनाची आठवण; खडसे भावुक
आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठे दुःख असलेल्या पुत्राच्या निधनाचा उल्लेख करताना खडसे भावुक झाले. या कठीण काळात कुटुंबीय, कार्यकर्ते आणि जनतेने दिलेल्या आधारामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, असे त्यांनी सांगितले. जनतेने आजवर दिलेले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही हे नाते असेच दृढ राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये खडसेंचे योगदान महत्त्वाचे’
अध्यक्षीय भाषणात शरदचंद्र पवार यांनी एकनाथराव खडसे यांच्या राजकीय योगदानाचा गौरव केला. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व मर्यादित असताना पक्षाची संघटनात्मक पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान विशेष असल्याचे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांचा इतिहास लिहिताना प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांची नावे वगळता येणार नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले. खडसे यांनी केवळ निवडणुका जिंकण्यापुरते राजकारण न करता ग्रामीण भागात संघटन उभी करण्यासाठी आणि पक्षाची मुळे तळागाळात घट्ट करण्यासाठी सातत्याने काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या विस्ताराचा इतिहास खडसे यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण राहील, असे पवार यांनी नमूद केले. विधानसभेतील खडसे यांच्या कार्यशैलीची आठवण सांगताना पवार यांनी आपण १९६७ मध्ये प्रथमच विधानसभेत निवडून आलो होतो, असे सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने भूमिका मांडणाऱ्या सदस्यांमध्ये खडसे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विरोधी बाकावरून खडसे सातत्याने आवाज उठवत. प्रश्नांची मांडणी, विषयाचा अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्व या गुणांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरले, असे पवार यांनी स्पष्ट केले.
विविध मान्यवरांकडून गौरव
शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील आणि रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनीही मनोगत व्यक्त करून खडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी प्रास्ताविकातून खडसे यांच्या सुमारे चार दशकांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित केलेला नसून खडसे यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी अमृत महोत्सव समितीतर्फे खडसे यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानचिन्हाचे वाचन केले. भोरगाव लेवा पंचायत, ठाया पाडळसे यांच्या वतीने पंचायतीचे कुटुंबनायक ललित पाटील व सदस्यांनी खडसे यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी डॉ. दिलीप तिवारी आणि प्रमोद बऱ्हाटे लिखित आमदार एकनाथराव खडसे यांच्या चरित्रग्रंथाचे तसेच विशेषांक *‘नाथ पर्व’*चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अमृत महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक, कार्यकर्ते आणि खडसे समर्थकांचे आभार मानले. जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि खडसेप्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती, जुन्या राजकीय संबंधांच्या आठवणी आणि खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा झालेला गौरव यामुळे कोथळीतील अमृत महोत्सव सोहळा विशेष चर्चेचा ठरला.