चोरीच्या घटनांविरोधात जिल्हाभर विशेष मोहीम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा व घरफोड्यांची गंभीर दखल; पोलीस-महावितरणला संयुक्त कारवाईचे निर्देश
जळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, वीजतारा, वीज साहित्य तसेच घरफोड्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबवावी. चोरीप्रवण भागांची स्वतंत्र नोंद करून रात्रीची गस्त वाढवावी, तसेच पोलीस व महावितरणने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वीजतारा व विद्युत साहित्य चोरीस प्रतिबंध करण्याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड परिसरातील चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता बैठकीत मांडली.

बैठकीत रावेर तालुक्यातील वनगाव, तासखेडा परिसरातील नदीकाठावरील विद्युत मोटारींच्या चोऱ्या, खिर्डी-निंबोल भागातील घरफोड्या, मुक्ताईनगरमधील वीजतारा व साहित्य चोरी तसेच बोदवडमधील घरफोड्यांचा आढावा घेण्यात आला.
‘चोरीच्या मुळापर्यंत जा’
शेतकऱ्याची मोटार चोरीला जाणे म्हणजे केवळ वस्तूची चोरी नसून त्याचा सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक नुकसान होते. त्यामुळे चोरीच्या घटनांचा तपास केवळ आरोपी पकडण्यापुरता मर्यादित न ठेवता चोरीचा माल कुठे जातो, तो कोण खरेदी करतो आणि यामागे संघटित टोळी आहे का, याचा शोध घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रावेर-मुक्ताईनगर-बोदवड भागातील चोरीच्या घटनांसाठी विशेष पथक कार्यरत करावे. चोरीप्रवण ठिकाणी नियमित पेट्रोलिंगसह संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष ठेवावे. आवश्यक असल्यास नदीकाठच्या भागात बोटीद्वारे गस्त घालण्याची व्यवस्थाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महावितरणने चोरी होणारे मार्ग व संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस व महावितरणने संयुक्त यंत्रणा उभारून माहितीची देवाणघेवाण करावी, असेही त्यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी चोरी करणाऱ्यांपासून चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांपर्यंत संपूर्ण साखळीवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी कॉपर, विद्युत मोटारी व वीजतारा चोरीबाबत सादरीकरण केले. बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, महावितरणचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.