शेतमोजणीसाठी एक हजारांची लाच; शिपाईसह सायबर कॅफे चालक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन किसन पाटील आणि खासगी सायबर कॅफे चालक राकेश रामदास चव्हाण यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) कारवाई करून पकडले.
शेतमोजणीसाठी केला होता अर्ज

या प्रकरणातील तक्रारदाराची भुसावळ तालुक्यातील गोजोरे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेमार्फत ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. मोजणीसाठी आवश्यक असलेले दोन हजार रुपयांचे शुल्कही त्यांनी भरले होते. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झाला.याबाबत तक्रारदाराने सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील यांच्याशी चर्चा झाली असून काम पूर्ण होईल, असे चव्हाण याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
लाचेची मागणी; एसीबीची कारवाई
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी राकेश चव्हाण याने तक्रारदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधून शेतमोजणी प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिपाई सचिन पाटील यांच्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. त्यात शिपाई सचिन पाटील याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पथकाने सापळा रचून दोघांविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.