शिवा शर्मा हत्या प्रकरणाला मोठे वळण; श्रद्धा दुबेसह तिघांना नागपुरातून अटक
नागपूर: लखनऊमधील रेस्टॉरंट मालक शिवा शर्माच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रद्धा दुबेला अटक करण्यात आली आहे. लखनऊ पोलिसांनी श्रद्धा दुबेवर ५० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तब्बल ११ दिवसांपासून श्रद्धा पोलिसांना गुंगारा देत होती. ती नेपाळला पळून गेल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात तिला नागपुरातून अटक करण्यात आली.
शिवा शर्मा हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी श्रद्धा दुबे , तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक तन्वीर यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश एसटीएफचं वाराणसी युनिट, लखनऊ कनिश्नरेट टीम आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नागपूरमधून तिघांना अटक केली.
उत्तर प्रदेश एसटीएफनं दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा सतत तिचा ठावठिकाणा बदलत होती. गेल्या ११ दिवसांपासून ती पोलिसांना चकवा देत होती. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिनं पोलिसांना गुंगारा दिला. श्रद्धा नेपाळला पळून गेल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी सुरू होती. त्यानंतर अचानक तिची मुलाखत एका वृत्तसंस्थेवर दिसली. लखनऊहून फरार झालेली श्रद्धा आग्रा येथील एका हॉटेलातही थांबली होती.
रेस्टॉरंट मालक शिव शर्माचा श्रद्धा दुबेच्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. श्रद्धा दुबे, तिची बहीण रश्मी दुबे आणि चालक या प्रकरणात आरोपी आहेत. तिघांवर लखनऊ पोलिसांनी ५०-५० हजारांचं बक्षीस घोषित केलं होतं.
श्रद्धा दुबेचा शोध ९ ऑक्टोबरपासून सुरू होता. या दरम्यान तपास पथकांना कानपूर नंबरच्या एका कारची माहिती मिळाली. श्रद्धा तिची बहीण रश्मी आणि चालक तन्वीर यांच्या सोबत याच कारमधून फिरत असल्याचा तपशील पोलिसांच्या हाती लागला. या माहितीच्या आधारे एसटीएफनं पुढील तपास केला आणि आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तपास पथकांनी आयपी ऍड्रेस ट्रॅक केला. याच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस श्रद्धा दुबेच्या नागपूरच्या ठावठिकाण्यापर्यंत पोहोचले. यूपी एसटीएफचं वाराणसी युनिट आणि लखनऊ पोलिसांची पथकं सातत्यानं श्रद्धाच्या मागावर होती.
