जळगावच्या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेसाठी निवड!
उत्तराखंडमधील मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई; नेपाळमध्ये चमकणार जळगावचे खेळाडू
जळगाव | प्रतिनिधी
जळगावच्या मातीत घडलेल्या तीन युवा पैलवानांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पैलवान हितांशू राजपूत, भूषण हटकर आणि शरद हटकर यांनी २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावले. या यशाच्या जोरावर तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई मल्लयुद्ध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या तिन्ही खेळाडूंनी आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील निवडीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वस्तादांच्या मार्गदर्शनातून यशाला गवसणी
या यशामागे त्यांचे वस्ताद पैलवान चेतन शिंदे, पैलवान कल्पेश मराठे, पैलवान आशिष ठाकरे आणि पैलवान भैया पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या बळावर या तरुण पैलवानांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
आमदार राजूमामा भोळे यांचे प्रोत्साहन
जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकण्याची संधी
जिद्द, मेहनत, शिस्त आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांच्या बळावर मिळवलेले हे यश जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. आता नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेतही हे तिन्ही पैलवान उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक वाढवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या तिन्ही पैलवानांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.