DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भोकरीतील SBI बँकेवर दरोड्याचा डाव फसला!

चार सराईत दरोडेखोर जेरबंद; ३६.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त

जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न जळगाव तालुका पोलिसांनी सतर्कता आणि नागरिकांच्या सहकार्याने उधळून लावला. ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भोकरी येथील SBI बँकेतील चोरीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बँकेची सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव उधळण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या सतर्कतेने कट उधळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे २.४५ ते ३.१५ वाजेदरम्यान आरोपी बँकेच्या परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळले. यावेळी बँकेचे सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी प्रतिकार केला. आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी दाखविलेली सतर्कता आणि पोलिसांना मिळालेली माहिती यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, भोकरी महिला पोलिस पाटील यांच्या पतीनेही घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेतला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली.

सराईत आरोपींचा समावेश

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकुश रघुशीराम पवार (चव्हाण), गजानन राजेंद्र पवार, शंकर रमेश जासक आणि अंकुश श्रावण चव्हाण यांचा समावेश आहे. हे आरोपी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही आरोपींविरुद्ध चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याचेही समोर आले आहे.

२७ किलो चांदीसह दोन वाहने जप्त

या कारवाईत पोलिसांनी सुमारे २७ किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम ११ लाख २६ हजार ५०० रुपये तसेच पल्सर २२० आणि होंडा शाइन या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.