DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; बदलत्या प्रवाहात नैतिकतेची जपणूक आवश्यक!

खासदार स्मिता वाघ यांचे प्रतिपादन : ज्येष्ठ संपादक धों.ज. गुरव यांना संपादक परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

जळगाव : समाजातील घडामोडींचे केवळ वृत्तांकन करणे एवढेच पत्रकारितेचे कार्य नसून समाजाला योग्य दिशा देण्याची आणि लोकशाहीतील सजग प्रहरी म्हणून भूमिका बजावण्याची मोठी जबाबदारी पत्रकारितेवर आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभाची विश्वासार्हता टिकविण्यासाठी सत्य, निष्पक्षता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे काळाची गरज आहे. मात्र, आजची पत्रकारिता काहीशी वेगळ्या वळणावर जात असल्याचे चित्र दिसत असून हा प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बदलत्या काळात पत्रकारितेने आपली मूल्याधिष्ठित ओळख कायम ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.
महाराष्ट्र संपादक परिषद, मुंबई यांच्या वतीने लोकशाहीचे सल्लागार संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशनच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात खासदार श्रीमती वाघ बोलत होत्या. मानचिन्ह, शाल, धनादेश आणि वृक्षाचे रोप देऊन श्री. गुरव यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या योगदानाचा हा सन्मान असून या निमित्ताने पत्रकारितेतील मूल्यांचा विचारही अधोरेखित झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, परिषदेचे पदाधिकारी श्री. तावरे, गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, लोकशाहीच्या संपादिका शांता वाणी, नगरसेवक विशाल भोळे उपस्थित होते.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, पत्रकारिता हे केवळ व्यवसायाचे साधन नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील प्रश्न, अन्याय, समस्या आणि लोकांच्या भावना शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करीत असतात. त्यामुळे पत्रकाराच्या लेखणीतून व्यक्त होणारा प्रत्येक शब्द समाजावर परिणाम करणारा असतो. अशा परिस्थितीत पत्रकारितेतील मूल्ये आणि विश्वासार्हता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध झाले आहेत. प्रसारमाध्यमांचे स्वरूपही झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीत पत्रकारितेने आपली जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्याची गरज आहे. पत्रकारितेची दिशा भरकटल्यास त्याचा परिणाम केवळ माध्यमांवरच नव्हे, तर संपूर्ण समाजव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे सत्याची बाजू मांडणारी, समाजहिताला प्राधान्य देणारी आणि लोकशाहीला बळकटी देणारी पत्रकारिता टिकली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांच्या पत्रकारितेचे कौतुक करीत पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही खासदार वाघ यांनी दिले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून त्यातील वास्तव जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत असतो. हे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने परिषदेच्या वतीने पुरस्कार दिले जातात, असे त्यांनी सांगितले. परिषदेच्या पुरस्कार परंपरेचा उल्लेख करताना पहिल्या पुरस्काराचा मान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी परिषद सातत्याने लढा देत असल्याचे सांगताना पत्रकार पेन्शन योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी परिषदेने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 20 हजार रुपये पेन्शन सुरू केली. मात्र, या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र पत्रकारांना मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांची आवश्यकता असून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार हा केवळ सन्मान सोहळ्यापुरता मर्यादित न ठेवता पुरस्कारार्थींच्या कार्याचा सन्मान त्यांच्या गावात जाऊन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाला प्रतिष्ठा मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे कुलथे यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देतांना श्री. गुरव यांनी त्यांना आलेले विविध अनुभव कथन केले. संकट आले मात्र कधीही खचलो नाही, मी सत्याच्या बाजूने लिखाण केल्याने त्रास झाला मात्र डगमगलो नाही, शेवटी सत्य हे सुर्यप्रकाशासारखे उजळ असल्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. परिवारातील सदस्य व मित्रवर्ग यांनी नेहमीच साथ दिल्याने मी माझी पत्रकारीता सुरुच ठेवणार असून आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात करतो असेही ते म्हणाले.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, लोकशाहीचे संचालक राजेश यावलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला विविध दैनिकांचे संपादक, राजजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरव यांनी आत्मचरित्र लिहावे : तिवारी
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी केलेले आवाहन विशेष लक्षवेधी ठरले. धों.ज. गुरव यांची पत्रकारिता ही नव्या पिढीला दिशा देणारी आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून पत्रकारितेतील अनेक महत्त्वाचे टप्पे, संघर्ष, बदल आणि शिकवण समोर येऊ शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाचे आत्मचरित्र लिहावे, असा आग्रह तिवारी यांनी धरला. गुरव यांच्या अनुभवांचा दस्तऐवज तयार झाल्यास तो केवळ आठवणींचा संग्रह न राहता पुढील पिढीतील पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल. आत्मचरित्र लेखनासाठी आपण स्वतः मदत करू, असे आश्वासन देत तिवारी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या या सूचनेला उपस्थितांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले तर आभार प्रकाश कुलथे यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी गोदावरी फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.