गोवंश कत्तल व मांसविक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; तिघांची सहा महिन्यांसाठी हद्दपारी
जळगाव : जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल, गोमांस विक्री तसेच नागरिकांना मारहाण करून विकलांग करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीविरुद्ध जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या टोळीतील तीन आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५ अन्वये सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले आहेत.
हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) आणि टोळी सदस्य परवीनबी मुक्तार कुरेशी (वय ४५), दोघेही रा. ३६ खोली, फातेमा नगर, जळगाव यांचा समावेश आहे. या टोळीतील तिसऱ्या आरोपीविरुद्धही संबंधित प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात गोवंश कत्तल व अवैध मांसविक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा अवैध व्यवसायात सक्रिय असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून सादर केला होता.
या टोळीतील आरोपींविरुद्ध एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांचा समावेश आहे. संबंधित गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये संबंधित आरोपींना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल आणि मांसविक्री करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.