DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावकरांची पाडवा पहाट सुरांनी उजळणार; १० नोव्हेंबरला महात्मा गांधी उद्यानात मैफल

जळगाव : दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून आकाशवाणी जळगाव आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी ‘पाडवा पहाट’ या प्रातःकालीन संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी उद्यानात सकाळी ६ वाजता ही मैफल रंगणार असून, अभंगवाणी, नाट्यगीते आणि सुगम संगीताच्या सुरेल सादरीकरणातून रसिकांना संगीताची अनोखी पर्वणी मिळणार आहे.

आकाशवाणी जळगावच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच चांदोरकर प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या संगीत मैफिलीत नाशिक येथील आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आशिष रानडे, ईश्वरी दसक्कर कदडी आणि पूजा दसक्कर हे गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर सुजित काळे, संवादिनीवर सुभाष दसक्कर, सिंथेसायझरवर विजय नेवे आणि ऑक्टोपॅडवर नितेश पाटील साथसंगत करणार आहेत. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दीपिका घैसास करणार आहेत.

या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, उद्योगपती अशोकभाऊ जैन तसेच कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टचे मेजर नानासाहेब वाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमाला भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम आकाशवाणी जळगाववरून प्रसारित होणार असल्याने सकाळी ठीक ६ वाजता मैफिलीला सुरुवात होणार आहे.

जळगावकर रसिकांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १० मिनिटे आधी महात्मा गांधी उद्यानात उपस्थित राहून आपापली आसने ग्रहण करावीत आणि दिवाळी पाडव्याच्या मंगलमय सकाळी सुरेल संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि कै. नथ्थूशेट चांदसरकर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.