DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड; दोन मोटारसायकली हस्तगत

एका आरोपीला अटक, दुसरा अल्पवयीन; सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

 

जळगाव : शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीस गेलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे.

शनिपेठ परिसरातील तरबेज सैय्यद आसिफ यांची हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १९ टी ७७७०) ही दुचाकी १ नोव्हेंबर रोजी अजिंठा चौफुलीजवळील इदगाह कॉम्प्लेक्समधील रिलायबल लॉजिंगच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याला ३ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत कुसुंबा येथील कैलास पाटील यांची हिरो एचएफ डिलक्स (एमएच १९ डीएस ५१४०) ही दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी कुसुंबा शिवारातून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास केला. यात एका अल्पवयीन बालकाचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.