DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

दोन दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी घेतले भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन; दोन तासांत ३३ अभिषेक

जळगाव : निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राच्या पावन पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यंदा कृत्तिका नक्षत्राचा कालावधी अधिक असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मंदिराचे द्वार उघडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेपर्यंत जवळपास ५० हजारांहून अधिक भाविकांनी भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मंदिराचे द्वार उघडल्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० या दोन तासांच्या कालावधीत ३३ अभिषेक करण्यात आले. मंदिराच्या अध्यक्षा श्रीमती वासंती अय्यर आणि मंदिराचे पुजारी कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमूर्ती पाठक गुरुजी गोविंद तिवारी यांनी मंत्रोच्चारात पूजाविधीला प्रारंभ केला. यावेळी केरळी महिला ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिवसभरात स्थानिक नगरसेवक, अतुल जैन, सीतारामदादा सोनवणे यांच्यासह आजी-माजी आमदार व खासदारांनीही मंदिरात येऊन भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

दोन किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांग
यंदा कृत्तिका नक्षत्राचा शुभयोग अधिक काळ असल्याने भाविकांचा उत्साह विशेष होता. दर्शनासाठी मंदिर परिसरापासून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. मंदिरासमोर अभिषेकासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाविकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासंदर्भात धार्मिक मार्गदर्शनही करण्यात येत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कपाळावर टिळा लावून चण्याचा प्रसाद देण्यात येत होता.अनेक भाविक नवस फेडण्यासाठी मंदिरात आले होते. भगवान कार्तिक स्वामींच्या दर्शनाने मनाला समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळते, अशी भावना काही भाविकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.रात्री १२.३० वाजता मंदिराचे द्वार बंद करण्यात आले. संपूर्ण उत्सवादरम्यान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. केरळी महिला ट्रस्टच्या सदस्यांनी दर्शन व पूजेच्या व्यवस्थेसाठी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.