DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला गिरीश महाजन यांची भेट, कामांची प्रत्यक्ष पाहणी

जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

जळगाव : जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी आज भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. जळगाव, जामनेर आणि पाचोरा या तीन तालुक्यांतील शेतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. योजनेतून सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी कधी पोहोचणार, याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भागपूर धरणातून पाणी उचलून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे या योजनेत नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाने योजनेला सुधारित मान्यता दिली आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार ५३३ कोटी ५ लाख रुपये आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे.

पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील २६ गावांना लाभ
पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे आणि देव्हारी यांसह २६ गावांतील शेतीला थेट सिंचन सुविधा देण्याचे नियोजन आहे. पिकांना गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या गावांसाठी पहिल्या टप्प्यातील कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ४९ सिंचन प्रकल्पांना पाणी
दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४४.५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे ९८.३५ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याचे नियोजन आहे. हे पाणी जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील पाच मध्यम आणि ४४ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साठविण्यात येणार आहे. त्यातून १६ हजार ८६० हेक्टर क्षेत्राला अधिक खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

एकुलती आणि गोलटेकडीच्या कामांसाठी ८० कोटींहून अधिक निधी
भागपूर योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील एकुलती येथे साठवण तलाव, तर पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव उभारण्यात येणार आहे. या दोन्ही तलावांसह संबंधित कामांसाठी ८० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याची माहिती मंत्री महाजन यांनी सप्टेंबरमध्ये दिली होती.

पाहणीवेळी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त व. द. पाटील, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आणि जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन उपस्थित होते. तसेच जळगाव उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद पांडुरंग वराडे, जळगावच्या संकल्पचित्र उपविभागीय पथक क्रमांक ३ चे सहायक अभियंता (श्रेणी १) चंद्रशेखर सुभाष खंबायत आणि कंत्राटदाराचे प्रतिनिधी किरण अडाव उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.