बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात चार जणांना अटक
RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे विमानतळावरून ताब्यात
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काढलेल्या विजयी मिरवणुकीत भीषण चेंगराचेंगरी घडली. या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी आता मोठी कारवाई झाली असून RCB चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी निखिल याला बेंगळुरू विमानतळावरून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, तो मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. चेंगराचेंगरीसंदर्भात त्याची भूमिका काय होती, याचा तपास सुरू असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आधीच एफआयआर दाखल केला होता.
या कारवाईनंतर पोलिसांनी DNA एंटरटेनमेंट नेटवर्क्स या आयोजक संस्थेच्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू अशी या तिघांची नावे असून त्यांची क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. या संस्थेनेच आरसीबीच्या विजयी मिरवणुकीचे आयोजन केले होते.
दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आयोजकांकडून कोणत्या नियमांची पायमल्ली झाली, कार्यक्रमासाठी परवानगी होती का, आणि सुरक्षेचे उपाय अपुरे होते का, याची चौकशी अधिक गतीने केली जात आहे. संबंधित संस्थांच्या जबाबदाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पोलिस यंत्रणेवर जबाबदारी टाकत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. परिणामी, पोलिस आयुक्तांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. यानंतर सीमांत कुमार सिंग यांची बेंगळुरूचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आरसीबीने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, ही अटक या प्रकरणात मैलाचा दगड ठरणार आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.