DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मान्सूनला पुन्हा गती! १३ जूनपासून पावसाचे मुसळधार आगमन, हवामान विभागाची ‘गुड न्यूज’

मुंबई : मे अखेरीस राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने सध्या काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता तो पुन्हा जोमात येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आगामी १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती देत, राज्यवासीयांना आणि बळीराजाला दिलासा देणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, ९ आणि १० जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही देण्यात आला असून घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात वाऱ्याचा वेग वाढणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांमध्ये व मराठवाड्यात सोमवारपासून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबत मेघगर्जना आणि विजांसह पाऊस कोसळू शकतो. परिणामी या भागांत पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

मुंबईत उकाडा कायम, हलक्याच सरींची शक्यता

सध्या मुंबई आणि उपनगरांत पावसाने काहीसा ब्रेक घेतल्याने उकाड्याची तीव्रता वाढली आहे. शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या असल्या, तरी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. तापमान विशेष वाढले नसले तरी दमट हवामानामुळे उकाडा जाणवत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या काही दिवसांत हलक्या सरी आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.